मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झालं. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यानंतर आता महापालिकेमधील महपौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे 22 जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल.
पत्रात नेमकं काय?
राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि.22.01.2026 रोजी, परिषद सभागृह, 6 वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे सकाळी 11 वा. पासून आयोजित करण्यात आली आहे. तरी, सदर बाब राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती, असं नगरविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
महापौर आरक्षण सोडत प्रक्रीयेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता
महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा ओपनपासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येते. समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी, यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते. सध्या कायद्यात एससी, एसटी, महिला आणि ओबीसींसाठी रोटेशनने आरक्षण आहे. मात्र, नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्यानं सुरु केली जाऊ शकते.
महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपची जोरदार मुसंडी- (Municipal Corporation Election Result 2026)
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपनं जोरदार मुसंडी मारली. मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपनं विजयी घोडदौड कायम ठेवली. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्तेचा सोपान गाठलाय. तर नागपूरमध्येही भाजपनं आपला गड अबाधित ठेवलाय. त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली.